
बीड, 14 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या एल निनोच्या संकटामुळे यंदा पर्जन्यमानात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राज्यातील जलसाठे सुरक्षित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी मुंबईतून अधिकृत परिपत्रक जारी करत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सध्या सुरू असलेली पाण्याची आवर्तने तातडीने बंद करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून प्रशासनाने हा तातडीचा पाऊल उचलले आहे.
या नव्या आदेशानुसार आगामी ३१ ऑगस्टपर्यंत सर्व शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अखंडित सुरू राहावा, यासाठी धरणांमधील राखीव पाणीसाठा अत्यंत काळजीपूर्वक वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक परिस्थिती वगळता पिण्याच्या पाण्याचा साठा इतर कोणत्याही कारणांसाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय धरणे, नद्या आणि कालव्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाचे संयुक्त पथक तैनात करून कडक कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे. स्थानिक पातळीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हा स्तरावर तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis