
एकूण १८ आरोपींविरुद्ध गुन्हे, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेडमधील औसा व कासार शिरशी येथे टाकले छापे
लातूर, १४ जून (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध जुगार आणि मटका व्यवसायांविरोधात नांदेड परिक्षेत्राच्या पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत १८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, संगणक साहित्य आणि मोटारसायकलींसह एकूण ४ लाख ६ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांना लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी मटका आणि जुगार व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नांदेड येथून विशेष पथक कारवाईसाठी रवाना करण्यात आले होते.विशेष पथकाने औसा शहरातील कालन गल्ली परिसरातील एका दुकानावर छापा टाकून सुरू असलेला मटका बुकीचा व्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत ४३ हजार १६० रुपये रोख, सुमारे ४९ हजार रुपयांचे पाच मोबाईल फोन आणि ७० हजार ८०० रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण १ लाख ६२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणात 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात औसा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ३२५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
कासार शिरशी येथे ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर कारवाई
यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने कासार शिरशी येथे छापा टाकला. येथे काही जण ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले.या कारवाईतही नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ३२ हजार ९१० रुपये रोख, ६५ हजार ८०० रुपयांचे नऊ मोबाईल फोन आणि १ लाख ४५ हजार रुपयांच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या ठिकाणाहून एकूण २ लाख ४३ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी कासार शिरशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. औसा आणि कासार शिरशी येथे करण्यात आलेल्या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १८ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ४ लाख ६ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध जुगार आणि मटका व्यवसायांवर भविष्यातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईत पंकज इंगळे, प्रदीप खानसळे, संजीव जिंकाळवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.अवैध व्यवसायांविषयी माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे देण्याचे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप यांनी केले आहे.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis