कर्जत-चौक मार्गावर झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू
रायगड, 15 जून (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील वडविहिरी गावाजवळ कर्जत-चौक मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवक हा त्याच्या ताब्यातील हिरो स
Head-on collision at Vadvihiri; both two-wheeler riders killed.


रायगड, 15 जून (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील वडविहिरी गावाजवळ कर्जत-चौक मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवक हा त्याच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-46/बीवाय-7210) दुचाकी घेऊन कर्जतकडून चौकच्या दिशेने जात होता. दरम्यान, वडविहिरी गावाच्या हद्दीत समोरून येणारी पल्सर (एमएच-46/बीटी-9462) दुचाकी भरधाव वेगात आली. पल्सर चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत विरुद्ध दिशेला जाऊन स्प्लेंडरला समोरासमोर जोरदार धडक दिली.

या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र दुखापती गंभीर असल्याने दोघांचाही मृत्यू झाला. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 229/2026 नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार करीत आहेत. दरम्यान, कर्जत-चौक मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande