
मनमाड, 15 जून (हिं.स.) पुणे आयुक्तालयातील खराडी पोलिसांत दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरारी आरोपींना मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने कोपरगावलगत कान्हेगाव येथे ऊसाच्या शेतात सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. विशेष म्हणजे पोलीस आपल्या मार्गावर असल्याची चाहूल लागल्याने या दोघा आरोपींनी धावत्या गाडीतून उड्या मारून ऊसाच्या शेताचा आधार घेतला होता.
याबाबतची माहिती अशी, की पुण्यातील खराडी पोलीस ठाणे येथून खुनाच्या गुन्ह्यातील संशयित दोन जण फरारी होते. पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दोन आरोपींचे फोटो मनमाड लोहमार्ग पोलिसांना पाठवले व खुनाच्या गुन्ह्यातील हे आरोपी पुणे येथून पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस या गाडीने पळून जात आहे. अशी माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय झाले. त्यांनी आरोपींची माहिती घेऊन शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. मनमाड लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या कोपरगाव येथील पोलीस कर्मचारी बाबासाहेब जरे, रामधन घोळ-वे, रेसूब उपनिरीक्षक राकेश कुमार यांनी माहितीच्या आधारे कोपरगाव रेल्वे स्थानकात पुणे गोरखपूर ही गाडी तपासली. गाडीतील प्रवाशांना संशयित आरोपींचे फोटो दाखवून विचारपूस सुरू केली असता फोटोतील दोन्ही इसम हे कान्हेगाव रेल्वे स्टेशनवर धावत्या गाडीतून उड्या मारून पळून गेले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळताच लोहमार्ग पोलिसांचे पथक तत्काळ कान्हेगाव परिसरात दाखल झाले. पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस पथक आल्याचे पाहून संशयित आरोपी हे उसाच्या शेतातून पळून जात असताना काट्याकुट्यातून वाट काढत पोलिसांनी धावत सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग सुरू ठेवला आणि अखेर दोन आरोपी त्यांच्या हाती लागले. त्यांना कोपरगाव येथे आणून विचारपूस केली. यामध्ये पहू अनिल उर्फ अनिश शेख (वय २२, धंदा पंचर काढण्याचे काम, ह.मु. खराडी पुणे, मूळ रा. बिहार) आणि सोहेल अनिल ऊर्फ शेख (वय २०, रा. खराडी, मूळ रा. बिहार) हे दोघेही संशयित सख्खे भाऊ असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना खराडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश जगदाळे यांच्या ताब्यात देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV