जळगावच्या सराफाला १८ लाखांचा गंडा
जळगाव, 15 जून (हिं.स.)गोल्ड लोनवर तारण ठेवलेले सोने सोडवून ते मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत जळगावातील एका सराफा व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
जळगावच्या सराफाला १८ लाखांचा गंडा


जळगाव, 15 जून (हिं.स.)गोल्ड लोनवर तारण ठेवलेले सोने सोडवून ते मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत जळगावातील एका सराफा व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबा) फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय अमृत महाजन यांचा मुलगा ओम संजय महाजन याच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जोशीपेठेतील कालभैरव मंदिराजवळ ‘ओम ज्वेलर्स’ नावाचे दुकान चालवणारे कृष्णा भगवान शिंदे (रा. रामचंद्र नगर, जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी संशयित आरोपी ओम महाजन याच्याशी त्यांची ओळख झाली होती. ४ जून रोजी ओमने शिंदे यांना फोन करून, बजाज फायनान्समध्ये तारण ठेवलेल्या १९८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर १९ लाख रुपयांचे गोल्ड लोन असल्याचे सांगितले. हे कर्ज फेडून दागिने मोडायचे (विकायचे) आहेत, असे सांगत त्याने पैशांची मदत मागितली. यावेळी त्याने एका बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाचे नाव सांगून शिंदे यांचा विश्वास संपादन केला व दागिन्यांचे फोटोही पाठवले.

५ जून रोजी ओम महाजन याने शिंदे यांच्या दुकानात जाऊन तातडीने पैशांची मागणी केली. शिंदे यांनी तात्कालीक स्वरूपात शेजारील सराफा व्यावसायिकाकडून १९ लाख रुपयांची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी ६ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ही १९ लाखांची रक्कम ओम महाजनच्या खात्यात जमा करण्यात आली. रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर ओमने ती गोल्ड लोन खात्यात वर्ग केल्याचे सांगितले. मात्र, कधी ‘केवायसी’ नाही तर कधी ‘खाते सीझ’ झाल्याच्या तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत त्याने वेळकाढूपणा केला. कोटक महिंद्रा बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया करूनही व्यवहार पूर्ण झाला नाही. अखेर ८ जून रोजी ओमने शिंदे यांच्या खात्यात केवळ ९९ हजार रुपये ऑनलाइन जमा केले आणि उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत फोन उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ओमचे वडील संजय महाजन यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी मुलगा घरी नसल्याचे सांगत केवळ चौकशीचे आश्वासन दिले. अखेर ना दागिने मिळाले, ना पूर्ण रक्कम परत मिळाली. आपली १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृष्णा शिंदे यांनी शनिपेठ पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांच्या तपासानंतर ओम महाजन याचे आणखी काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande