जळगाव : दोन घरांतून ३.६५ लाखांचे दागिने चोरले
जळगाव , 15 जून (हिं.स.) शहरातील मेहरुण तलाव परिसरातील लेकसाईट रेसिडेन्सी येथे घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीने दोन वेगवेगळ्या घरांमधून तब्बल ३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोल
जळगाव : दोन घरांतून ३.६५ लाखांचे दागिने चोरले


जळगाव , 15 जून (हिं.स.) शहरातील मेहरुण तलाव परिसरातील लेकसाईट रेसिडेन्सी येथे घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीने दोन वेगवेगळ्या घरांमधून तब्बल ३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी समोतीबाई धर्मराज धांडेकर (वय ३९) हिला अटक केली असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी चोरीच्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात लेकसाईट रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या सुधा पुरुषोत्तम काबरा यांच्या घरी देखभालीसाठी समोतीबाई धांडेकर गेल्या चार महिन्यांपासून काम करत होत्या. तसेच समोरील बंगल्यात राहणारे पियूष दीपक संघवी यांच्या घरीही त्या आठ ते नऊ महिन्यांपासून घरकामासाठी जात होत्या. मात्र सुधा काबरा या जालना येथे जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि मंगलपोत काढण्यासाठी पाहिले. मात्र दागिने जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत कुटुंबीय आणि मोलकरणीकडे चौकशी केली, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. त्या घरी परतल्या त्यावेळी मोलकरीण समोतीबाई धांडेकर ह्या मूळ गावी गेल्याचे समजले. त्याचवेळी शेजारी राहणारे पियूष संघवी यांनीही घरातील दागिने तपासले असता त्यांच्या पत्नी तेजल संघवी यांचा सोन्याचा शॉर्ट नेकलेस आणि कानातील टॉप्स गायब असल्याचे आढळून आले. काही दिवसांनी समोतीबाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी जळगावात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्या रहिवास करत असलेल्या ठिकाणी आढळून न आल्याने सुधा काबरा आणि पियूष संघवी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपी महिलेने सुधा काबरा यांच्या घरातून सुमारे एक लाख रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दीड लाख रुपये किमतीचे तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगलपोत चोरले. तसेच तेजल संघवी यांचा ७५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा शॉर्ट नेकलेस आणि ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स असा एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी समोतीबाई धर्मराज धांडेकर हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande