
छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)। कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला बळकटी देणारा आणि हजारो कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. प्रत्येक कुंभार कुटुंबाला ७०० ब्रास माती मोफत उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर येथील बेगमपुरा परिसरातील कुंभार समाजाच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर दादा शितोळे, मंडल अध्यक्ष अमोल झळके, माजी नगरसेवक गणू पांडे, नागराज गायकवाड, शिवाजी इंजे पाटील आणि संजय फतेलश्कर यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी सतीश कमलाकर गोडबोले, गणेश जोबले, मनोज कोणे, लक्ष्मण कसारे, रामेश्वर साकडे, रमेश जिरे, किशोर कोणे, अजय कोणे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
मातीची भांडी, रांजण, मटके, मूर्ती तसेच इतर पारंपरिक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कुंभार समाजासाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. या उपक्रमामुळे पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी मिळून कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला. कुंभार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारंपरिक व्यवसायाच्या जतन-संवर्धनासाठी घेतलेल्या या लोकहितकारी निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार!
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis