
अमरावती, 14 जून (हिं.स.) : तिवसा तालुक्यातील चेनुष्ठा परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. परिसरात एक नव्हे तर दोन बिबटे मुक्तपणे फिरत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून चेनुष्ठा येथील नाणीबाई ढोणे आणि वसुले यांच्या शेत परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी शेतात जाणाऱ्या नागरिकांना, शेतमजुरांना तसेच गावाबाहेर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना बिबट्या दिसल्याच्या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी वनविभागाकडे लेखी तसेच तोंडी तक्रारी केल्या आहेत. तक्रारीची गंभीर दखल घेत वनविभागाने संबंधित परिसरात पाहणी सुरू केली असून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, बिबट्याचा वावर निश्चित झाल्यानंतर परिस्थितीनुसार पुढील आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. मात्र, कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी परिसरात पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मानवी जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे चेनुष्ठा परिसरातील नागरिकांचे लक्ष आता वनविभागाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल घुटे यांनी सांगितले की, “चेनुष्ठा परिसरातील नागरिकांकडून बिबट्याच्या वावराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार वनविभागाचे पथक सातत्याने पाहणी करत असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पुरावे संकलित करण्यासाठी आणि हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येत आहेत.”
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी