
बीड, 14 जून (हिं.स.) : अंबाजोगाई शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात सध्या पुरेसा जलसाठा उपलब्ध असतानाही नागरिकांना १० ते १२ दिवसांआड पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महावितरणकडून पाणीपुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. दुष्काळ असो किंवा सुकाळ, गेल्या तीन दशकांपासून अंबाजोगाईकरांना ८ ते १० दिवस साठवलेले पाणी वापरण्याची वेळ येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
धनेगाव येथील एक्सप्रेस फिडरला वीजपुरवठा खंडित होणे, वादळ-वाऱ्यामुळे वीजखांब पडणे किंवा जलवाहिन्यांमध्ये बिघाड होणे ही कारणे प्रशासनाकडून नेहमीच पुढे केली जातात. मात्र, २४ तास अखंडित वीजपुरवठ्यासाठी असलेल्या एक्सप्रेस फिडरमध्ये वारंवार बिघाड कसा होतो, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शहराचा वाढता विस्तार, जुनी झालेली जलवाहिनी व्यवस्था आणि अपुऱ्या जलकुंभांमुळे पाणीपुरवठ्यावर ताण येत असल्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, नळाच्या पाण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिक वाढली आहे. पाणी पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणत्याही वेळी सोडले जात असल्याने नागरिकांना दिवसभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे दैनंदिन कामकाज आणि बाहेर जाण्याचे नियोजनही विस्कळित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis