
छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.)आंभोडा कदम येथे गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारला. अवैध दारू विक्री, निर्मिती व साठवणुकीला आळा घालण्यासाठी गावातील महिला व तरुण मंडळाच्या पुढाकाराने जनजागृती मोर्चाचे आयोजन करण्यात आले.अवैध दारू विकणे, बनवणे व साठवणे हा कायद्याने गुन्हा असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 अंतर्गत संबंधितांवर कारवाई होऊ शकते, अशी माहिती यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली.
या मोर्चात गावचे पोलीस पाटील हरिभाऊ विष्णू महाजन, ज्ञानेश्वर पवार, भास्कर सरवदे, रोहिदास सरोदे यांच्यासह गावातील शेकडो महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविला. मोर्चादरम्यान संपूर्ण गावात फेरी काढून अवैध धंदे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.
गावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेच्या समस्येबाबत चिंता व्यक्त करत, तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी धूम्रपान, पानमसाला व मद्यपान यावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच, अशा पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना यापुढे विक्री थांबविण्याबाबत चेतावणी देण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी, व्यसनमुक्त आणि सुरक्षित गाव घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे आंभोडा कदम परिसरात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक संदेश पोहोचत असल्याची चर्चा सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis