
बीड, 15 जून (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील केज ते अंबाजोगाई रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून पती-पत्नीला लुटणाऱ्या चार दरोडेखोरांपैकी दोघांना केज पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे. ही धडक कारवाई करण्यात आली. धनराज सूर्यवंशी व त्यांची पत्नी आपल्या मोटरसायकलवरून पिसेगाव फाट्यावरून गावाकडे जात असताना, चार अज्ञात दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जोडप्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. यावेळी पीडित दांपत्याने आरडाओरडा केल्याने घाबरलेले चोरटे स्वतःची एक मोटरसायकल जागीच सोडून जंगलात पळून गेले होते.
घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व त्यांच्या पथकाने तातडीने तपास चक्र फिरवले. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित चोरटे केज शहरातून कळंब रोडने जात असताना पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहून दरोडेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून हॉटेल संतोष पॅलेस समोर दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. ते धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपींच्या झडतीमध्ये चोरीची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, केज पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis