ऍड. जिविता पाटील यांना ‘राष्ट्रीय कार्यदर्पण सन्मान पुरस्कार-2026’
रायगड, 16 जून (हिं.स.) : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशनच्या संस्थापिका ॲड. जिविता सूरज पाटील यांना ‘राष्ट्रीय कार्यदर्पण सन्मान पुरस्कार-2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबई येथील मराठी पत्
Adv. Jivita Patil honored


रायगड, 16 जून (हिं.स.) : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशनच्या संस्थापिका ॲड. जिविता सूरज पाटील यांना ‘राष्ट्रीय कार्यदर्पण सन्मान पुरस्कार-2026’ प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबई येथील मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्य दर्पण यूट्यूब चॅनल आणि महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार आणि आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुनील अगलावे यांच्या हस्ते ॲड. जिविता पाटील यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला कर्करोग शास्त्रज्ञ तथा विश्वशांती दूत डॉ. अजमद खान, जलसंपदा विभागाचे विशेष अधीक्षक डॉ. जे. के. महाडिक, कार्य दर्पणच्या संचालिका सलमा खान, नियोजक नासिर खान, बेंज हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. आबीद सय्यद, नाट्य व नृत्य दिग्दर्शक पंकज पांडाळे, राखी विजय पाटील तसेच उपनिरीक्षक ज्योत्स्ना तायडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ऍड. जिविता पाटील या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून त्यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांनी आतापर्यंत 48 अनाथ मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून अनेक विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच रोजगार प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत त्यांनी एम.ए., बी.एड., एमएसडब्ल्यू, एम.फिल., एलएलबी आणि एलएलएम अशा विविध पदव्युत्तर पदव्या प्रथम श्रेणीत संपादन केल्या आहेत. सध्या त्या ‘डिप्लोमा इन कौन्सिलिंग’ हा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत.

अंगणवाडी सेविका, समुपदेशक, पत्रकार, निवेदिका आणि विविध सामाजिक संस्थांमधील पदाधिकारी म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील तब्बल 192 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

‘राष्ट्रीय कार्यदर्पण सन्मान पुरस्कार-2026’ मिळाल्यानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून ॲड. जिविता पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्राचा गौरव वाढल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande