
लातूर, 19 जून (हिं.स.)। लातूर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे यांनी शुक्रवारी (दि. १९) मनपातील तब्बल ११ विभागांना अचानक भेट देत कामकाजाची पाहणी केली. या अचानक तपासणीत अनेक विभाग प्रमुख व कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आले असून संबंधितांवर कारवाईचे संकेत महापौरांनी दिले आहेत.
महानगरपालिकेत विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यामुळे नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची गंभीर बाब समोर आली होती.
या तक्रारींची दखल घेत महापौरांनी नगरसेवकांसह विविध विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक विभाग प्रमुख व कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी अनुपस्थित आढळले. काही कर्मचाऱ्यांनी रजा दिल्याचे सांगण्यात आले, मात्र संबंधित रजा मंजूर नसतानाही ते गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.
महापौरांनी भेट दिलेल्या सर्व ११ विभागांचे हजेरीपट तपासणीसाठी ताब्यात घेतले असून गैरहजर कर्मचाऱ्यांबाबत आयुक्तांशी चर्चा करून योग्य कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी हा गंभीर प्रकार असून संबंधितांची शहानिशा केली जाईल. लातूरकरांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, असेही महापौर जयश्री सोनकांबळे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis