
अमरावती, १९ जून (हिं.स.) : नागपूर युनिर्व्हसिटी टिचर्स असोसिएशन संघटनेचे (नुटा) संस्थापक, माजी शिक्षक आमदार आणि विदर्भातील शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रा. बी. टी. देशमुख (बापूसाहेब) यांचे आज, शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रा. देशमुख यांनी संघर्षातून शिक्षण पूर्ण करत अमरावतीतील महाविद्यालयात इंग्रजी आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कारकीर्द सुरू केली. शिक्षकांच्या समस्या जवळून अनुभवताना त्यांनी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित चळवळीची गरज ओळखली आणि नुटा संघटनेची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली नुटाने शिक्षकांच्या वेतन, सेवाशर्ती आणि शैक्षणिक हक्कांसाठी अनेक ऐतिहासिक लढे उभारले.
विदर्भातील शिक्षकांचा प्रचंड विश्वास संपादन करत प्रा. देशमुख अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून सलग पाच वेळा, तब्बल ३० वर्षे विधानपरिषदेवर निवडून गेले. संसदीय कामकाजाच्या नियमांवरील प्रभुत्व, कायद्याचा सखोल अभ्यास आणि आकडेवारीच्या आधारे मुद्देसूद मांडणी यामुळे त्यांची ओळख सभागृहाचा चालता-बोलता नियमसंग्रह अशी निर्माण झाली होती.
शिक्षकांच्या प्रश्नांसोबतच त्यांनी विदर्भाच्या विकासासाठीही सातत्याने आवाज उठवला. सिंचन व विकास कामांतील अनुशेष, प्रादेशिक असमतोल आणि विदर्भावरील आर्थिक अन्याय या विषयांवर त्यांनी सरकारला अनेकदा धारेवर धरले. दांडेकर आणि केळकर समित्यांच्या अहवालांचा सखोल अभ्यास करून त्यांनी विदर्भाच्या हक्कासाठी प्रभावीपणे लढा दिला.
साधी राहणी आणि उच्च विचार ही त्यांची ओळख होती. ३० वर्षे आमदार राहूनही त्यांनी सत्तेचा किंवा सुविधांचा वैयक्तिक लाभ घेतला नाही. आमदार निधीतील प्रत्येक रुपयाचा पारदर्शक हिशोब जनतेसमोर मांडण्याची त्यांची परंपरा लोकप्रतिनिधींसाठी आदर्श मानली जाते.
प्रा. देशमुख हे उत्तम वक्ते, लेखक आणि अभ्यासकही होते. शिक्षण, अर्थशास्त्र, विदर्भाचा विकास आणि संसदीय कार्यपद्धती यांवर त्यांनी विपुल लेखन केले. शिक्षकांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी 'न्यूटा बुलेटीन'चे संपादनही केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी