
लातूर, 19 जून (हिं.स.)। मराठवाड्यात सर्वाधिक पानटपऱ्या असलेलं शहर म्हणून लातूरची ओळख, पण या शहरातील निम्म्याहून अधिक पान टपऱ्या ह्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयूक्त तुकाराम मुंडे यांच्या धसक्याने बंद आहेत तर सतत गुटखा चघळणाऱ्या शौकीनांवर आता 'गाय छाप', सुर्य छाप तोटा खाण्याची वेळ आली आहे.
लातूर शहर हे पानटपरीचे शहर म्हणून ओळख आहे. इतर वस्तूचे शोरूम सजवावे तसे या शहरात अत्यंत आकर्षकपणे 'टपऱ्या' सजविण्यात आलेल्या आहेत. शहरातील अनेक टपऱ्या त्या नावाजलेल्या आहेत. काही टपऱ्यांपुढे तर सतत २० ते २५ तरूण, गुटखा शौकीन दिसायचे. राज्य शासनाने गुटखा, गुटखाजन्य ईतर पदार्थ उत्पादन, विक्री,
बाळगण्यास बंदी घातली असतानाही तो सर्रास उपलब्ध व्हायचा, गुटख्याची उलाढाल कोटीवर व्हायची. पण, राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पद्मार स्वीकारल्यापासून आणि गुटखा, पानमसाला आदी पदार्थ विक्री, साठवणूक, वाहतूक करणाऱ्याविरूद्ध 'मकोका' लावण्याची घोषणा केल्यापासून शहर व जिल्ह्यातील हजारो पानटपऱ्या बंद आहेत.बंदी असली तरी गुटखा सर्रास विक्री व्हायचा पण तुकाराम मुंडे यांचा धसका घेतल्याने अनेक टपरी मालक आपल्या टपऱ्या बंद करून, तुकाराम मुंडे यांची केंव्हा एकदा बदली होते याची प्रतिक्षा करीत आहेत. काही टपऱ्या चालू आहेत. टपरीवर आता साधी किसान, गायछाप, सुरज अशा तंबाखूच्या पुड्या विकाव्या लागत आहेत. टपरीवर येऊन सहसा कोण भरडी सुपारी, बडीसोप खात नाही. लातूर शहर व जिल्ह्यातील 'गुटखा' शौकीनांचा मात्र मोठा हिरमोड झाला आहे.असे असले तरी काही ठराविक टपरी धारकांनी आपल्याटपऱ्या बंद केल्या असल्या तरी रिस्क घेऊन गुटखा चालत-फिरत ते विकतात. ठराविक शौकीन मोबाईलवर मागणी करतात आणि मोठी किंमत मोजून त्यांना 'घरपोच' मिळतो आहे, अशी चर्चा आहे. पण मोकाच्या भितीने चोरून गुटखा विक्री करणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis