
नागपूर,16 जून (हिं.स) : नागपूर येथील रिझर्व्ह बँक चौकात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे मुख्य संयोजक अभिजित दीपके यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करत स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
देशात नीटसह विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर सातत्याने फुटत असल्याने गरीब व कष्टकरी कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप दीपके यांनी केला. बिघडलेल्या शैक्षणिक व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढत असून, आत्महत्यांच्या घटनांसाठी सरकार जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले.
या सभेला सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. परीक्षा घोटाळ्यांमुळे आत्महत्या केलेल्या नागपूरच्या आकांक्षा आणि राजस्थानच्या प्रदीप मेघवाल यांच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगत, सरकारने या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी दीपके यांनी केली.
देशातील शिक्षण व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीस जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका टिप्पणीचा संदर्भ देत त्यांनी भ्रष्ट व्यवस्थेविरोधात तरुणांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
परीक्षांमधील गैरप्रकार आणि वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात २० तारखेला दिल्ली येथे देशभरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन होणार असल्याची माहिती देत, नागपूरकरांनी या चलो दिल्ली आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दीपके यांनी केले.
-------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी