
अलिबाग, 16 जून (हिं.स.) : जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे मणक्याच्या गंभीर दुखापतीवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, अपघातामुळे दोन्ही पायांची ताकद गमावलेल्या 68 वर्षीय रुग्णाला नवजीवन मिळाले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रायगड जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सा विभागात मज्जातंतु शल्यचिकित्सातज्ञ (न्यूरोसर्जन) डॉ. कृष्णमूर्ती कोकणकर रुजू झाल्यानंतर मेंदू व मणक्यावरील विविध शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. नवगाव येथील 68 वर्षीय रुग्णाला अपघातात पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. परिणामी त्यांच्या दोन्ही पायांची ताकद कमी झाली होती आणि हालचालींवर गंभीर परिणाम झाला होता.
या रुग्णावर न्यूरोसर्जन डॉ. कृष्णमूर्ती कोकणकर आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिनिष काटकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डॉ. देवानंद पवार, डॉ. सविता नल्लामडगे, डॉ. शितल कोकणकर, डॉ. विवेक आणि डॉ. गार्गी यांनी शस्त्रक्रियेदरम्यान प्रभावी भूल व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्यांच्या दोन्ही पायांची ताकद पूर्णपणे परत आली आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर टाके काढून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
या शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सा विभागातील डॉ. मयुरी कांबळे, डॉ. अशोक गजभिये आणि डॉ. रविभूषण कासले यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले. अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच अपघातग्रस्त तसेच मेंदू आणि मणक्याच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी अलिबाग येथील उपलब्ध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)