
लातूर, 16 जून (हिं.स.)। नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस - नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट पोलीस उप महानिरीक्षक यांच्यासमोर आपली व्यथा मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक हे प्रत्येक महिन्यास जिल्हा मुख्यालयांना भेटी देत असतात. यादरम्यान, त्या त्या जिल्ह्यातील तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या तक्रारी व अडीअडचणी समजावून घेऊन, त्या तत्परतेने सोडवण्याचा पोलीस उप महानिरीक्षक यांचा प्रयत्न आहे. गत महिन्यात, लातूर, हिंगोली, परभणी व नांदेड या जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे माध्यमातून, मोठ्या प्रमाणावर आपल्या तक्रारी पोलीस उप महानिरीक्षक यांच्यासमोर मांडल्या होत्या.
दिनांक 16 जून रोजी, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी, पोलीस अधीक्षक, लातूर कार्यालयात जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर, दुपारी 3 ते 6.30 या वेळेत जिल्ह्यातील तक्रारदारांशी 'संवाद' साधला. यादरम्यान, एकूण (73) तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज पोलीस उप महानिरीक्षक यांना सोपविले. यात, मालमत्ता विषयक वाद, हरवलेले इसम, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय, इत्यादी तक्रारींचा समावेश आहे.
सदर दिवशी, प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन, त्यांच्या शिघ्र सोडवणुकीसाठी संबंधित अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश देण्यात आले आहेत.
तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या शिघ्र सोडवणुकीसाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच 'संवेदना' ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. आज रोजी 'जनसंवाद' उपक्रमादरम्यान, प्राप्त झालेले सर्व अर्ज ‘संवेदना’ पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार असून, प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेण्यात येणार आहे.याप्रसंगी, पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व लातूर शहरातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे हजर होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis