
शेकापकडून अरविंद म्हात्रेंना उमेदवारी
रायगड, 16 जून: कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील एकमेव विधानपरिषद जागेसाठी विविध पक्षांकडून दावेदारी वाढत असल्याने निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर) यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी शिवसेनेकडून विकास गोगावले यांचे नाव चर्चेत होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करून निवडणुकीत नवा ट्विस्ट आणला आहे. अलिबाग येथील शेतकरी भवनात झालेल्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण 1,018 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक तसेच पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा या मतदारसंघात समावेश असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते.
महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेसला, याबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच शिवसेनेकडून दोन इच्छुक पुढे आल्याने राजकीय उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे, शेकापने स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे महायुतीसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही शेकापने स्वतंत्र भूमिका घेतल्याने आघाडीची पुढील रणनीती काय असेल, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने कोकणातील ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात असून, उमेदवारी आणि पक्षीय रणनीतींमुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)