कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रगती शिंगरुत बिनविरोध; शेकापचा झेंडा फडकला
रायगड, 16 जून (हिं.स.) : अलिबाग तालुक्यातील कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रगती सुभाष शिंगरुत यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्
अविश्वास ठरावानंतर रिक्त झालेल्या पदावर निवड; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष


अविश्वास ठरावानंतर रिक्त झालेल्या पदावर निवड; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष


रायगड, 16 जून (हिं.स.) : अलिबाग तालुक्यातील कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रगती सुभाष शिंगरुत यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुवर्णा पाटील यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.

कामार्ले ग्रामपंचायतीमध्ये एकूण 10 जागांपैकी थेट सरपंच आणि सहा सदस्यांसह सात जागांवर शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीची सत्ता आहे. यापूर्वी उपसरपंचपदाची धुरा शिंदे गटाचे सूरज राजन गिरी यांच्याकडे होती. मात्र सदस्यांना विश्वासात न घेता कारभार केल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्यांनी 18 मार्च 2026 रोजी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.

त्यानंतर 20 मार्च रोजी झालेल्या विशेष बैठकीत हा अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सूरज गिरी यांना उपसरपंचपद गमवावे लागले होते. त्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. प्रगती शिंगरुत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

निवडीची घोषणा होताच ग्रामपंचायत कार्यालयात शेकाप व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या हस्ते प्रगती शिंगरुत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते कैलास गजने, ग्रामपंचायत सदस्य अनिता पाटील, प्रगती पाटील, तुकाराम नाईक, गीता नाईक, ऋषीकेश नागावकर यांच्यासह शेकाप व महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रगती शिंगरुत या शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून त्या सलग चार वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या राजकीय अनुभवाचा ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे कामार्ले ग्रामपंचायतीतील शेकापचे वर्चस्व आणखी मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande