रायगड जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला प्रारंभ; 0 ते 5 वर्षांतील बालकांचे घराघरांत सर्वेक्षण
रायगड, 16 जून (हिं.स.) : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला मंगळवारी (ता. 16) सुरुवात करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे घराघर
‘Stop Diarrhea’ campaign launched in Raigad district; door-to-door survey of children aged 0 to 5 years.


रायगड, 16 जून (हिं.स.) : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला मंगळवारी (ता. 16) सुरुवात करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या अभियानात आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी सहभागी झाले असून अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि प्राथमिक शाळांमधून जनजागृती करण्यात येत आहे. सर्वेक्षणादरम्यान एखादे बालक अतिसारग्रस्त आढळल्यास त्याला तात्काळ ओआरएस आणि झिंक सप्लिमेंट देऊन उपचार सुरू करण्यात येणार आहेत.

अभियानाच्या माध्यमातून सर्व आरोग्य संस्था आणि अंगणवाड्यांमधून ओआरएस व झिंकचे वितरण करण्यात येत आहे. तसेच निव्वळ स्तनपान, रोटा व्हायरस लसीकरण, हातांची स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे महत्त्व याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जात आहे. शाळा व अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना योग्य पद्धतीने हात धुण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.

याशिवाय सर्व आरोग्य संस्था व अंगणवाड्यांमध्ये ‘ओआरएस-झिंक कॉर्नर’ सुरू करण्यात आले आहेत. पालक-शिक्षक सभा आणि इतर माध्यमांतून अतिसाराविषयी जनजागृती करण्यात येणार असून संभाव्य अतिसार उद्रेकाची वेळेवर दखल घेऊन आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यावर भर दिला जात आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande