रत्नागिरी : प्रत्येक गावात कडवट भाजप कार्यकर्त्यांची फौज निर्माण करावी - रविंद्र चव्हाण
रत्नागिरी, 17 जून, (हिं.स.) । प्रत्येकाने आपापल्या गावांमध्ये किमान पाच कडवट भाजपा विचारांच्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण करावी, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात भाजप
भाजपच्या मेळाव्याला जमलेले कार्यकर्ते


रत्नागिरी, 17 जून, (हिं.स.) । प्रत्येकाने आपापल्या गावांमध्ये किमान पाच कडवट भाजपा विचारांच्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण करावी, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.

येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक गावात निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामुळेच आज आपल्याला एवढी मोठी पदे मिळत आहेत. भाजप पक्षाची सत्ता केंद्रापासून राज्य सरकारांपर्यंत आली आहे. ती सत्ता फक्त आणि फक्त तळागाळात असणाऱ्या कडवट विचारांच्या कार्यकर्त्यामुळेच आली आहे.

तो पुढे म्हणाले, कोकणात बेरोजगारीचे संकट मोठ्या प्रमाणावर आहे. इकडचे तरुण गाव सोडून मुंबईला जातात आणि त्यामुळे गावे ओस पडली आहेत. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. कोकणात अनेक मंदिरे आहेत, हिंदू धर्माची धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये मार्लेश्वर, गणपतीपुळे, संगमेश्वर सूर्यमंदिर, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, राजापुरातील श्री धूतपापेश्वर मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. या ठिकाणी धार्मिक पर्यटन विकसित झाले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. त्यामुळे आपापल्या गावातील, तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी धार्मिक पर्यटन स्थळांचा आराखडा तयार करून आमच्यापर्यंत पाठवा. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू.

यावेळी विधान परिषद आमदार प्रमोद जठार, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार डॉ. विनय नातू, आमदार प्रशांत ठाकूर, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अॅड. वैभव खेडेकर, अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार सूर्यकांत दळवी, रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चिपळूण, खेड, मंडणगड, राजापूर, रत्नागिरी या भागातील असंख्य कार्यकर्ते, माजी नगरसेवक, माजी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande