आकाशाकडे लागले डोळे; पावसाअभावी शेतकरी संकटात
रायगड, 17 जून (हिं.स.)। : मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि ग्रामस्थ चिंतेत सापडले आहेत. जून महिन्याचा मध्य उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर बनली आहे. विहिरी, बो
All eyes turned to the sky; Farmers in distress due to lack of rain.


रायगड, 17 जून (हिं.स.)। : मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि ग्रामस्थ चिंतेत सापडले आहेत. जून महिन्याचा मध्य उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर बनली आहे. विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी शेतांची मशागत, बांधबंदिस्ती आणि इतर पूर्वतयारीची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, पावसाअभावी भात पेरणी आणि लागवडीची कामे ठप्प झाली आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास भात उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, तीव्र उष्णतेचा फटका बागायतदारांनाही बसत आहे. आंबा, नारळ, सुपारी तसेच इतर फळबागांमधील झाडांना पाण्याअभावी ताण जाणवत असून अतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी खर्च वाढला आहे. सततच्या उकाड्यामुळे नव्याने लावलेल्या रोपांनाही धोका निर्माण झाला आहे.

अलिबाग, पेण, मुरूड, कर्जत, महाड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव आदी तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. अनेक विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर असून ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. विशेषतः महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असून नळांभोवती सकाळ-संध्याकाळ लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.

काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी वाढली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून मान्सूनच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande