सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून वृद्धेची सोन्याची चैन लुबाडणारा भामटा जेरबंद
बीड, 17 जून (हिं.स.)। अंबाजोगाई शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत परळी येथील एका वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याची चैन चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या पंधरा दिवसांत अटक केली आहे. दिलीप विश्वनाथ स्वामी (वय ४७ वर्षे, रा. मह
सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून वृद्धेची सोन्याची चैन लुबाडणारा भामटा जेरबंद


बीड, 17 जून (हिं.स.)।

अंबाजोगाई शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत परळी येथील एका वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याची चैन चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या पंधरा दिवसांत अटक केली आहे. दिलीप विश्वनाथ स्वामी (वय ४७ वर्षे, रा. महादेव गल्ली, चाकूर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील फिर्यादी सुमनबाई मधुकर कांबळे (वय ६५ वर्षे, रा. भीमनगर, परळी वैजनाथ) या अंबाजोगाई येथील शिवाजी चौक ते पंचायत समिती मार्गाने जात असताना दोन अनोळखी भामट्यांनी त्यांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्यावर भुरळ घालून गळ्यातील १ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन फसवणुकीने चोरून नेली होती. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र गतिमान करत आरोपीला बेड्या ठोकल्या आणि चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या बळावर मुख्य आरोपी दिलीप स्वामी याला लातूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील १ लाख रुपयांची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक तेजस वावळे हे करत आहेत. ही कौतुकास्पद कामगिरी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस नाईक तेजस वावळे, पोलीस हवालदार पांडुरंग काळे, भागवत नागरगोजे, अमोल गायकवाड तसेच पोलीस अंमलदार सुशांत गायकवाड व हनुमंत चादर यांच्या पथकाने अत्यंत चोखपणे पार पाडली असून पोलीस प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande