रायगडमध्ये आदिवासी कन्यांसाठी ‘पिंक रूम’ उपक्रमाचे उद्घाटन
रायगड, 17 जून (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील आदिवासी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत आदिवासी मुलींच्या आरोग्य, सुरक्षितता आणि आत्मसन्मानाला प्राधान्य देणाऱ्या ‘पिंक रूम’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शैक्षणि
An-exemplary-initiative-by-the


An-exemplary-initiative-by-the


An-exemplary-initiative-by-the


रायगड, 17 जून (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील आदिवासी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत आदिवासी मुलींच्या आरोग्य, सुरक्षितता आणि आत्मसन्मानाला प्राधान्य देणाऱ्या ‘पिंक रूम’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या शाळा प्रवेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. ही संकल्पना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या माध्यमातून प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या पुढाकाराने साकारण्यात आली आहे.

किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या काळात आरामदायी, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

‘पिंक रूम’मध्ये आरामदायी बेड, गरम पाण्याची पिशवी, गरम पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रथमोपचार पेटी, वजन काटा तसेच आरोग्यविषयक माहितीफलक यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच ‘गुड टच-बॅड टच’, बालविवाह प्रतिबंध, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकांची माहितीही देण्यात आली आहे.

या उपक्रमात सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी आणि सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे छोटे ग्रंथालयही उभारण्यात आले आहे.

याच कार्यक्रमात डिजिटल पॅनल वर्ग आणि टॅब रूमचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अपर आयुक्त गोपीचंद कदम, ललित कुमार वराडे, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अशा प्रकारच्या ‘पिंक रूम’ संकल्पना राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande