आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय कृषी पुरस्कारांसाठी अर्ज मागविले
परभणी, 17 जून (हिं.स.)। वैज्ञानिक शेती व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, नवकल्पना आणि ज्ञान प्रसाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रगत व नवोन्मेषी शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी आत्मा अंतर्गत सन २०२६-२७ च
आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय कृषी पुरस्कारांसाठी अर्ज मागविले


परभणी, 17 जून (हिं.स.)।

वैज्ञानिक शेती व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, नवकल्पना आणि ज्ञान प्रसाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रगत व नवोन्मेषी शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी आत्मा अंतर्गत सन २०२६-२७ च्या तालुकास्तरीय कृषी पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.दि. १ जुलै २०२६ रोजी आयोजित ‘कृषी दिन’ कार्यक्रमात निवड झालेल्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. २४ जून २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अर्जांची छाननी करून गुणांकनाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.उमेदवार हा संबंधित तालुक्यात प्रत्यक्ष शेती करणारा, किमान १० वर्षांचा शेतीचा अनुभव असलेला तसेच पीक उत्पादन, पशुपालन, बागायती किंवा संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेला असावा. कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र किंवा संशोधन संस्थांसोबत तंत्रज्ञान प्रसार व विस्तार कार्यात सहभाग असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे चारित्र्य उत्तम असावे व तो परिसरात आदर्श शेतकरी म्हणून ओळखला जात असावा.अर्जासोबत सातबारा अथवा ८-अ उतारा, आधार कार्ड, संक्षिप्त जीवनपरिचय, नवकल्पना व कामगिरीचे पुरावे तसेच छायाचित्रे, अभिप्राय व प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय अथवा त्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच झेरॉक्स प्रत, ई-मेल, व्हॉट्सअॅप किंवा अन्य माध्यमातून पाठविलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा, दौलत चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande