रत्नागिरी : माजी आमदार बाळ माने यांना तूर्त भाजपमध्ये प्रवेश नाही - चव्हाण
रत्नागिरी, 17 जून (हिं.स.) । ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चेत असलेल्या माजी आमदार बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्
रत्नागिरी : माजी आमदार बाळ माने यांना तूर्त भाजपमध्ये प्रवेश नाही - चव्हाण


रत्नागिरी, 17 जून (हिं.स.) । ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चेत असलेल्या माजी आमदार बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

पत्रकारांशी संवाद साधताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, जे नेते पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे बाळ माने यांच्यासह भाजपमध्ये प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या काही नेत्यांच्या राजकीय भविष्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून देण्यात आलेली अधिकृत उमेदवारी मागे घेतल्यानंतर बाळ माने यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी बाळ माने यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेत ते भाजपचे जुने सहकारी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या भाजपमधील फेरप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande