
बीड, 17 जून (हिं.स.)।
जून महिना सुरू झाला तरी पावसाने दडी मारल्यामुळे बीड जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले असून, प्रशासन आणि बळीराजाची चिंता कमालीची वाढली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या एकूण १६७ धरण प्रकल्पांमध्ये आता केवळ १७.२५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी तब्बल ७९ लघु प्रकल्प 'जोत्याखाली' म्हणजेच मृत साठ्यात गेले असून, १४ पाणीसाठा प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठणठणीत पडले आहेत. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे शेतातील पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत.
जिल्ह्यातील धरणांची एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ७६९.६७९ दलघमी इतकी असली, तरी सध्या केवळ १३२.७६२ दलघमी पाणी उपलब्ध आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या २४.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर २३ लघु व कोल्हापुरी बंधारे मिळून अवघा ८.२२ टक्के उपयुक्त साठा उरला आहे. आष्टी तालुक्यातील नागतळवाडी, लोणी, पिंपळा, खुंटेफळ साठवण तलाव आणि पाटोद्यातील मुंगेवाडी, इंचरणा यांसह अनेक प्रकल्प पूर्णपणे आटले आहेत. धरणे जोत्याखाली गेल्याने केवळ मृत साठा उरला असून, मोठ्या पावसाशिवाय हा पाणीप्रश्न सुटणे अशक्य दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis