

बोगस आदिवासींचे लकीभाऊ जाधव यांच्या तक्रारीनुसार धडक कारवाई
नाशिक / ठाणे, 17 जून (हिं.स.)।
- बोगस दाखल्यांच्या आधारे खऱ्या आदिवासी समाजात घुसखोरी करणाऱ्या भुरट्या लोकांचा कर्दनकाळ म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव हे ओळखले जातात. खऱ्या आदिवासीच्या जागांमध्ये घुसून आदिवासी समाजाचे होणारे अभूतपूर्व नुकसान रोखण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ठाणे मनपाच्या प्रभाग क्र. ५ अ मधून अनुसूचित जमाती राखीव जागेवरून बिनविरोध निवडून आलेल्या सुलेखा शिवाजी सूर्यवंशी उर्फ सुलेखा सुधाकर चव्हाण यांचे कोळी मल्हार जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र जप्त करण्यात आले असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास आदेशीत करण्यात आले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती धुळेचे सहआयुक्त प्रदीप पोळ, उपसंचालक स्नेहल गोवेकर, वरिष्ठ संशोधन अधिकारी निलय राठोड यांनी याबाबत आज आदेश पारित केला. सुलेखा चव्हाण यांच्या जात पडताळणी प्रस्तावात १९५० पूर्वीचे आदिवासी जमातीचे जोडलेले पुरावे बनावट व पुनर्लेखित असल्याचे महत्वाचे कारण आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासह त्यांच्या नात्यातील मनोज प्रकाश सूर्यवंशी, हर्षाली प्रकाश सूर्यवंशी यांचे जोडलेले वैधता प्रमाणपत्र समितीची दिशाभूल करून मिळवले असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक मनपाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किरण राजवाडे यांचेही प्रमाणपत्र लकीभाऊ जाधव यांच्या प्रयत्नांनी अवैध ठरवण्यात आलेले आहे. म्हणून सुलेखा चव्हाण, किरण राजवाडे यांचे २ नगरसेवकांचे पद धोक्यात आल्याने दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे. संबंधित बोगस नगरसेवकांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क पूर्वलक्षी प्रभावाने काढून घ्यावा, त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावे. बोगस आदिवासी झालेल्या लोकांना धडा शिकवावा अशी मागणी लकीभाऊ जाधव यांनी केली आहे. लवकरच नाशिक शहरातील पोलीस अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरणार असल्याचेही श्री. जाधव म्हणाले. बोगस आदिवासी लोकांच्या पाठीशी राहून आदिवासी समाजाला फसवणाऱ्या तथाकथित लोकप्रतिनिधीना सुद्धा धडा शिकवू अशी गर्जना त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV