
परभणी, 17 जून (हिं.स.)।
एकल महिला धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख व वास्तवाधिष्ठित करण्याच्या दृष्टीने नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती व संबंधित विभागांचे अधिकारी यांच्याकडून सूचना व अभिप्राय प्राप्त करण्यासाठी मंगळवार दि. 23 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे.एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्यविषयक व पुनर्वसनासंदर्भातील प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे. त्यानुसार महिला व बाल विकास मंत्री तथा राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मसुदा समिती गठित करण्यात आलेली आहे.23 जून रोजी आयोजित कार्यशाळेसाठी नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती व संबंधित विभागांचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis