
परभणी, 17 जून (हिं.स.)।
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे कुटूंबियांविरोधात सातत्याने व खूलेआमपणे टीका टिप्पणी करीत तीव्र नाराजी व्यक्त करणारे शिवसेनेचे उपनेते तथा विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी बुधवारी ठाकरे कुटूंबियांना जय महाराष्ट्र करीत शिवसेना शिंदे गटाशी सलगी केली. गेल्या वर्षभरापासून खासदार जाधव यांनी या ना त्या कारणाने पक्षश्रेष्ठींच्या विरोधात सातत्याने तक्रारींचा सूर आळवला होता. विशेषतः संघटनात्मक नियुक्त्यांसह बांधणीत श्रेष्ठी विश्वासात घेत नाहीत, असे नमूद करीत शहरप्रमुखांपासून जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्यात समर्थकांना डावलल्याबद्दल खुलेआमपणे व सातत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार व्यक्त केलेल्या नाराजीबाबत श्रेष्ठींनीही दुर्लक्षपणाची भूमिका घेतली. त्यानंतर खा. जाधव यांनी श्रेष्ठींवर जोरदारपणे टीका टिप्पणी सुरु केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर हेलपाटे मारुनसुध्दा भेट होत नाही. ठाकरे कुटूंबियांभोवतीचा कोंडवाळा खासदारांनासुध्दा भेटू देत नाही, असा थेट आरोप केला. व त्यापोटी राजीनाम्याचीही भाषा सुरु केली. ठाकरे हे मुंबई पलिकडे फारसा विचार करीत नाहीत, युवा नेते आदित्य ठाकरे हे सुध्दा मुंबई व्यतिरिक्त अन्यत्र निवडणूका असो, अन्य संघटनात्मक बांधणीत फारसा वेळ देत नाहीत, दौरे करीत नाहीत, असा गंभीर आरोपही केला. पक्षा करीता जीवाचं रान, रक्ताचं पाणी केलेल्या आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास, खासदार या नात्यानेसुध्दा पक्षश्रेष्ठींच्या दरबारी स्थान नाही, मग भाजपासारख्या महाकाय शक्तीविरोधात लढायचं तरी कसं? असा सवाल सुरु करीत जाधव यांनी आपल्या समर्थकांसह सामान्य कार्यकर्त्यातसुध्दा पदोपदी नाराजीचा सूर प्रगट केला. राज्य व केंद्रातील सत्तारुढ भाजपा विरोधात संघर्ष करतेवेळी ठाकरे कुटूंबियांसह पक्षश्रेष्ठींनीसुध्दा आपल्यासह समर्थकांना अक्षरशः वार्यावर सोडावे, या बद्दल तीव्र खंत व्यक्त करतेवेळी समर्थकांसह सामान्य कार्यकर्त्यांच्या हिताकरीता आपणास वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देऊन विरोधाचे, बंडखोरीचे संकेतसुध्दा द्यावयास सुरुवात केली. आपलं होत तरी काय? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेच्या कृपादृष्टीने आपण शाखा प्रमुखापासून ते शिवसेना उपनेते पदापर्यंत मजल मारली. नगरसेवकापासून सभापती ते दोनदा आमदार व खासदार म्हणून हॅट्रीक साधली. यापेक्षा आपणास काय हवं? असा सातत्याने आणि खूलेआमपणे सवाल करणार्या खासदार जाधव यांनी शिवसेना म्हणजे आपला श्वास आहे, शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना सोडणार नाही, शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या ज्वलंत आणि प्रखर हिंदुत्ववादी विचारांसह आईसमान शिवसेनेनेबरोबर, ठाकरे कुटूंबियांबरोबर कदापिही गद्दारी करणार नाही, अशी भिष्मप्रतिज्ञासुध्दा जाहीरपणे घेतली. परंतु, गेल्या सव्वा वर्षापासून पक्षीय वर्तूळात अस्वस्थ असणार्या जाधव यांनी तक्रारी, नाराजी, टीका टिप्पणी करतेवेळी ठाकरे कुटूंबियांशी फारकतीचासुध्दा निर्णय घेतला. अन् समर्थकांसह स्वतः शिवसेना शिंदे गटात सामील होण्याबाबत सकृतदर्शनी संकेतसुध्दा दिले. त्यामुळेच गेल्या सहा-आठ महिन्यांपासून आज ना उद्या ते ठाकरे कुटूंबियांना जय महाराष्ट्र करणार अन् शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार, हे पक्ष श्रेष्ठींसह या जिल्हयातील राजकीय वर्तूळास नव्हे, सामान्य कार्यकर्त्याससुध्दा कळून चुकले होते. अपेक्षेप्रमाणे जाधव यांनी मंगळवारी नांदेडमार्गे चार्टर्ड विमानाने दिल्ली गाठून शिंदे गटाच्या बैठकीस हजेरी लावली. अन् समर्थनसुध्दा जाहीर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis