घोडबंदर रोडचे नामांतर यमलोक मार्ग करा; मनोज प्रधान यांचा उपरोधिक टोला
ठाणे, 17 जून (हिं.स.)। नियमितपणे वाहतूक कोंडीत अडकलेल्या घोडबंदर रोडवरील विविध अपघातांमध्ये गेल्या सोळा महिन्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मृत्यू मार्गाला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देऊन त्यांचा अवमान का करता? असा संतप्त सवाल करून या र
घोडबंदर रोडचे नामांतर यमलोक मार्ग करा; मनोज प्रधान यांचा उपरोधिक टोला


ठाणे, 17 जून (हिं.स.)। नियमितपणे वाहतूक कोंडीत अडकलेल्या घोडबंदर रोडवरील विविध अपघातांमध्ये गेल्या सोळा महिन्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मृत्यू मार्गाला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देऊन त्यांचा अवमान का करता? असा संतप्त सवाल करून या रस्त्याचे नामांतर यमलोक मार्ग असे करावे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे.

उपमहापौर कृष्णा पाटील यांनी घोडबंदर रोडला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याला नाव मराठा सैन्याच्या महान सेनापतीचे नाव देणे हा त्यांचा अवमान असल्याची टीका मनोज प्रधान यांनी केली आहे.

प्रधान म्हणाले, वीर चिमाजी अप्पा हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनापती आणि थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू होते. पोर्तुगीजांच्या जुलमी सत्तेतून ठाणे आणि वसईचा किल्ला मुक्त करून त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे, ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ ककाबे दी तन्ना नावाचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. या ठिकाणी पोर्तुगीज हे अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत असे, त्यामुळे या जागेला घोडबंदर हे नाव पडले. चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने या किल्ल्याला वेढा घालून १७३७ मध्ये पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला. एकूणच पाहता, या परिसराला वीर चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा इतिहास आहे. पोर्तुगीजांच्या जुलुमातून मराठी माणसाची मुक्तता करण्यासाठी चिमाजी अप्पा यांनी लढा दिला होता. मात्र, आता सत्तेवर असलेल्यांनी पोर्तुगीज आणि ब्रिटीशांप्रमाणेच घोडबंदरवासियांवर विविध माध्यमातून अन्याय करण्यास सुरूवात केली आहे. नवीन ठाणे म्हणून उदयास येत असलेल्या घोडबंदर रोडवरील मेट्रोचे काम, सर्व्हीस रोडवरच उभारलेले मेट्रोचे पिलर आणि स्टेशन्स, बोगदा, खोदलेले रस्ते आणि अवजड वाहनांच्या वर्दळ , अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे आणि सतत होणाऱ्या अपघातांमुळे रोजच वाहतूक कोंडी होत आहे. कापूरबावडी, माजिवडा, गायमुख आणि मानपाडा येथे कोंडीची मोठी समस्या आहे. त्यातून ठाणेकरांचे हालच होत आहेत. वीर चिमाजी आप्पा हयात असते तर त्यांना आपल्याच जनतेचे हे हाल पहावले नसते. त्यांनी पुन्हा एकदा ठाणेकरांचे हाल करणाऱ्यांवर आपली तलवार उगारली असती. त्यामुळे अशा रस्त्याला चिमाजी अप्पांचे नाव देऊन त्यांचा अवमान करण्याचा काय अधिकार आहे? असा संतप्त सवाल मनोज प्रधान यांनी केला.

या मार्गावर वारंवार होणारे अपघात , त्यात मृत्युमुखी पडणारे ठाणेकर आणि जायबंदी होणारी माणसे पाहता या रस्त्याचे खरे नाव यमलोक मार्ग असेच करायला हवे. त्यातून विकासाच्या नावाखाली शहराला सूज आणणाऱ्या प्रवृत्तीला अक्कल येईल, असा टोलाही प्रधान यांनी लगावला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande