
लातूर, 17 जून, (हिं.स.)। लातूरच्या शेतकरी, व्यापारी आणि मराठवाड्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स (MNI) अर्थात राष्ट्रीय महत्त्वाची बाजार समितीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करत लातूर बाजार समितीच्या राष्ट्रीय स्तरावरील योगदानाची माहिती दिली. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही केवळ मराठवाड्याचीच नव्हे, तर महाराष्ट्रातील एक प्रमुख कृषी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. धान्य, डाळी, कडधान्ये, तेलबिया आणि इतर कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर येथे खरेदी-विक्री होत असून महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यांतील शेतकरी व व्यापारी या बाजारपेठेशी जोडले गेले आहेत.
दरवर्षी लाखो मेट्रिक टन शेतमालाची उलाढाल होत असल्याने लातूरने कृषी व्यापार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे बाजार समितीला MNI दर्जा मिळाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक स्पर्धात्मक व चांगला दर मिळण्यास मदत होईल. तसेच बाजार व्यवस्थेत पारदर्शकता वाढून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी थेट संपर्क प्रस्थापित होईल.
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी निवेदनात नमूद केले की, केंद्र व राज्य शासन शेतकरी हिताचे विविध निर्णय घेत असताना सर्व निकष पूर्ण करणाऱ्या लातूर बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा मिळणे ही काळाची गरज आहे. या निर्णयामुळे केवळ लातूरच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी, व्यापारी, हमाल, अडते आणि कृषी क्षेत्राशी संबंधित लाखो कुटुंबांना थेट लाभ होणार आहे.
या मागणीमुळे लातूर बाजार समितीला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्यासोबतच कृषी व्यापार क्षेत्रात मराठवाड्याचे महत्त्व आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis