नाशिकमध्ये महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनची स्थापना; ‘स्नेहकुंभ 2026’ मेळावा ठरला ऐतिहासिक
नाशिक, 17 जून (हिं.स.) : केटरिंग असोसिएशन नाशिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्नेहकुंभ 2026’ या राज्यस्तरीय भव्य मेळाव्यात महाराष्ट्रातील केटरिंग उद्योगासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला. या व्यासपीठावर महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन (MCA) ची अ
Historic establishment of


नाशिक, 17 जून (हिं.स.) : केटरिंग असोसिएशन नाशिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्नेहकुंभ 2026’ या राज्यस्तरीय भव्य मेळाव्यात महाराष्ट्रातील केटरिंग उद्योगासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला. या व्यासपीठावर महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन (MCA) ची अधिकृत स्थापना जाहीर करण्यात आली तसेच असोसिएशनच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आडके यांनी व्हिडीओ कॉलद्वारे महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या स्थापनेस शुभेच्छा दिल्या. राज्यातील केटरिंग व्यवसाय संघटित होऊन अधिक सक्षम होण्यासाठी ही स्थापना महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दोन दिवस चाललेल्या या मेळाव्यात महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे 1200 ते 1300 केटरर्सनी सहभाग नोंदवला. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अभूतपूर्व ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी उत्तमराव गाढवे, कार्याध्यक्षपदी योगेशभाई चंदाराना, उपाध्यक्षपदी दडूभाऊ पुरोहित व महेशभाई लाहोटी, खजिनदारपदी पुरुषोत्तम जयपुरिया, सहखजिनदारपदी हेमल शाह, सचिवपदी अमरीश पुनियानी आणि सहसचिवपदी वैभव नातू यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परिमल मर्चन्ट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या स्थापनेची प्रस्तावना वैभव नातू यांनी मांडली, तर संघटनात्मक बांधणी व भविष्यातील उद्दिष्टांबाबत सागर गाढवे यांनी सविस्तर माहिती दिली.

या वेळी केटरिंग व्यवसायाची वाढ, व्यावसायिक विकास आणि पुढील पिढीकडे कौटुंबिक व्यवसायाचे हस्तांतरण या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया केटरर्स (FAIC) च्या पदाधिकाऱ्यांनी आगामी राष्ट्रीय अधिवेशनासाठी जयपूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचा समारोप नितीन जोशी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. ‘स्नेहकुंभ 2026’ मुळे महाराष्ट्रातील केटरिंग व्यवसायाला नवे संघटनात्मक बळ मिळाले असून उद्योगाच्या भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे मानले जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande