रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे – प्रमोद जठार
रत्नागिरी, 17 जून (हिं.स.) । राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत मांडली. जागतिक स्तरावर क्रूड ऑइलचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, भवि
रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे – प्रमोद जठार


रत्नागिरी, 17 जून (हिं.स.) । राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत मांडली.

जागतिक स्तरावर क्रूड ऑइलचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, भविष्यातील इंधन आणि वीजनिर्मितीसाठी अणुऊर्जा हा महत्त्वाचा पर्याय ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जठार यांनी सांगितले की, या संदर्भात त्यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. जैतापूर-माडबन तसेच गुहागर येथील आरजीपीपीएल परिसरात शासनाने आधीच जमीन संपादित केली असून, तेथे हा प्रकल्प उभारण्याची संधी उपलब्ध आहे.

केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार आता पीपीपी मॉडेलद्वारे खासगी गुंतवणूकही शक्य असून, सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे.

यावेळी त्यांनी प्रकल्पांना होणाऱ्या विरोधावरही टीका केली. “केवळ राजकारणासाठी प्रकल्पांना विरोध करणे योग्य नाही. चांगल्या प्रकल्पांना समर्थन देणे हीच विकासाची भूमिका असावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उदाहरणाचा दाखला देत ते म्हणाले, त्या वेळी विरोधी पक्षात असूनही आम्ही प्रकल्पाला समर्थन दिले. कारण तो रोजगार निर्माण करणारा होता. कोकणातील नेत्यांनीही विकासाभिमुख भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande