
जळगाव , 17 जून (हिं.स.) ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या दरात जवळपास ४०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे.आज १७ जून रोजी जळगावच्या सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचे दर खाली आले आहेत. आज जळगावात १० ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह (GST) १ लाख ५४ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्यात ४०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दराने ग्राहकांना अधिक मोठा दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांत चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते, परंतु आज त्यात तब्बल ४ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. आज १७ जून रोजी जळगावात १ किलो चांदीसाठी जीएसटीसह (GST) २ लाख ५७ हजार ५०० रुपये भाव निश्चित झाला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि मागणी-पुरवठ्यातील बदलांमुळे सोन्या-चांदीच्या दरात ही घसरण झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरांमध्ये झालेली ही घट तात्पुरती आहे की येत्या काळात भाव आणखी कमी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर