
लातूर, 17 जून (हिं.स.)। कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत लातूर जिल्हा पोलीस दलाने सामाजिक उत्तरदायित्वाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ३१०४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले असून हा उपक्रम लातूर जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे.
लातूर जिल्हा पोलीस, इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित डॉ. भालचंद्र ब्लड सेंटर, लातूर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड जवान आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदानाच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प साकार केला.
या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे रक्तदानासोबत रस्ता सुरक्षा अभियानाची जोड देण्यात आली. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास मोफत हेल्मेट देण्यात आले. त्यामुळे रक्तदानासोबतच हेल्मेट वापराबाबत जनजागृती निर्माण झाली आणि रस्ते अपघातांमधील मृत्यू कमी करण्याचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.
या मोहिमेत भादा पोलीस स्टेशनने २५२ रक्तपिशव्या संकलित करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. उदगीर, रेणापूर, गांधी चौक, किनगाव, जळकोट, चाकूर, वाढवणा, एमआयडीसी आणि औसा पोलीस स्टेशनसह सर्वच घटकांनी उल्लेखनीय योगदान दिले. या उपक्रमातून पोलीस दलातील सामाजिक जाणीव, संघटनशक्ती आणि जनहितासाठीची तळमळ अधोरेखित झाली.
उन्हाळ्यात रक्तसाठ्याचा तुटवडा जाणवत असताना लातूर पोलिसांनी उचललेले हे पाऊल हजारो रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, थॅलेसेमियाग्रस्त बालके आणि गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या अनेक रुग्णांना या रक्तसाठ्याचा थेट लाभ मिळणार आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली लातूर पोलीस दलाने गेल्या काही महिन्यांत समाजाभिमुख उपक्रमांची मालिका राबविली आहे. रक्तदान शिबिराच्या या अभूतपूर्व यशामुळे लातूर पोलीस दलाची प्रतिमा केवळ कायद्याचे रक्षक म्हणून नव्हे, तर समाजहितासाठी सदैव तत्पर असलेल्या संवेदनशील आणि जबाबदार यंत्रणा म्हणून अधिक उंचावली आहे.
पोलीस आणि जनता यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याबरोबरच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हेच या उपक्रमामागील उद्दिष्ट आहे, अशी भावना व्यक्त करत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदाते, पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड जवान आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे अभिनंदन केले.
लातूर जिल्हा पोलीस दलाने राबविलेला हा विक्रमी उपक्रम सामाजिक उत्तरदायित्व, मानवता आणि जनसेवेचा आदर्श नमुना ठरत असून राज्यातील इतर पोलीस दलांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis