
लातूर, 17 जून (हिं.स.)।
: देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेली ‘नीट यूजी’ पुनर्परीक्षा (Re-NEET) २१ जून २०२६ रोजी होत असून परीक्षेची पारदर्शकता, गोपनीयता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेपूर्वी सर्व बंदोबस्त अधिकारी, जिल्हा समन्वय अधिकारी, संपर्क अधिकारी, केंद्र अधीक्षक, वाहतूक नियंत्रण अधिकारी, एस्कॉर्ट पथके आणि परीक्षा केंद्रांवरील समन्वय अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी परीक्षेचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व आणि संवेदनशीलता अधोरेखित करत प्रत्येक अधिकाऱ्याला अत्यंत सतर्कतेने कर्तव्य पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व इतर गोपनीय साहित्याच्या वाहतुकीसाठी विशेष पोलीस एस्कॉर्टची नियुक्ती करण्यात आली असून साहित्याच्या सुरक्षित हालचालीवर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून पुरेशा प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष गस्त पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. परीक्षा केंद्र परिसरातील गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. बंदोबस्तात सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यादरम्यान मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरास मनाई करण्यात आली असून प्रभावी समन्वयासाठी वॉकी-टॉकी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले आहे की, परीक्षेच्या प्रक्रियेत कोणत्याही स्तरावरील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही. अशा घटना निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या राष्ट्रीय जबाबदारीत लातूर जिल्हा पोलीस दल पूर्ण क्षमतेने सहभागी झाले असून ‘नीट यूजी’ पुनर्परीक्षा शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्विघ्न वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis