
दिंडोरी, 17 जून (हिं.स.)।
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, वणी आणि दिंडोरी परिसरात पोलिसांकडून वेळोवेळी गुटखा तस्करांवर कारवाई होत असली, तरी काही काळानंतर पुन्हा त्याच जोमाने गुटखा विक्री आणि तस्करी सुरू होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एवढ्या धाडी आणि गुन्हे दाखल होऊनही गुटखा व्यावसायिकांचे मनोबल नेमके कोण वाढवत आहे, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधील कथित साखळीच्या माध्यमातून प्रतिबंधित गुटखा व्यवसाय फोफावत असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे.गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरातमधील वापी परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिक जिल्ह्यात पोहोचत असल्याचे सांगितले जाते. दिंडोरीपासून सुमारे 148 किलोमीटर, वणीपासून 145 किलोमीटर आणि नाशिकपासून 152 किलोमीटर अंतरावर असलेल्या वापी येथून माल महाराष्ट्रात आणला जात असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुटखा तस्करीसाठी ठरावीक मार्ग, साठवणुकीची ठिकाणे, घाऊक व किरकोळ विक्रेते तसेच वितरण केंद्रांचे जाळे आधीपासून निश्चित केलेले असते. व्यवहारांसाठी सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. दूरध्वनीवरही अत्यंत मर्यादित संवाद साधला जातो. आर्थिक व्यवहार आगाऊ किंवा पूर्वनियोजित माध्यमातून पूर्ण केले जातात. त्यामुळे संपूर्ण साखळीचा मागोवा घेणे यंत्रणांसाठी आव्हानात्मक ठरते.विशेष बाब म्हणजे, स्थानिक पातळीवर गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर हा गुटखा नेमका कोठून आला, त्याची निर्मिती कोठे झाली आणि तो स्थानिक बाजारपेठेत कसा पोहोचला, याचा सखोल तपास होऊन उत्पादकांपर्यंत कारवाई पोहोचल्याची उदाहरणे फारशी दिसलेली नाहीत. त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून हा व्यवसाय पूर्णपणे रोखणे शक्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे. महाराष्ट्र-गुजरात गुटखा साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कारवाई केल्यास या अवैध व्यवसायाला मोठा आळा बसू शकतो. त्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि विविध विभागांमधील प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसायांविरोधातील कारवाईला गती मिळाल्याचे दिसत आहे. गुटखा तस्करांची पाळेमुळे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही गुजरातमधील वलसाड परिसरातील उत्पादनाशी संबंधित पॅकिंग असलेला प्रतिबंधित गुटखा जप्त झाल्याची प्रकरणे समोर आली होती. पोलिसांनी अनेकदा तस्करांवर कारवाई केली असली, तरी काही तस्कर वारंवार या व्यवसायात सक्रिय होत असल्याने यंत्रणांसमोर हे मोठे आव्हान बनले आहे. गुटखा निर्माते, तस्कर आणि विक्रेते यांच्यावर मकोकासारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत पूर्वी हालचाली झाल्या होत्या. मात्र त्या प्रक्रियेला अपेक्षित गती का मिळाली नाही, याबाबत संबंधित विभागांनी स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त होत आहे.पोलीस विभागाने अवैध व्यवसायांच्या उच्चाटनासाठी राबविलेल्या मोहिमा निश्चितच कौतुकास्पद आहेत. मात्र, केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता अन्न व औषध प्रशासन विभागानेही अधिक आक्रमक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या छुप्या वाहतुकीचा मागोवा घेऊन तस्करीच्या संपूर्ण साखळीवर प्रहार करणे ही काळाची गरज असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV