
डोंबिवली, 17 जून (हिं.स.)। पश्चिम विभागातील मोठागाव माणकोली उड्डाणपुलावरून रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची संख्या वाढत आहेत. गेल्या आठवड्यापासून या पुलावर अपघात होत आहेत. सदर उड्डाणपुलावरील वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांकडून लक्ष दिले जात नसल्याने भविष्यात अपघात वाढण्याची शक्यता आहे. भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी याविषयी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे असे ठणकावून सांगितले असल्याचे समोर येत आहे. परिणामी आता या पुलावरून अवजड वाहने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
माणकोली मोठागाव उड्डाणपूल हा वाहतूक करण्यासाठी जारी खुला झाला असला तरी या पुलावर अवजड वाहनांना बंदी असतानाही सर्रासपणे वाहनांची डोंबिवली शहराकडे येण्याची संख्या वाढत आहे. उड्डाणपुलाच्या एकाच बाजूने आणि काही वेळा चुकीचा मार्गांवर वाहने येत असल्याने अनेक अपघात झाल्याचे भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे सांगतात.
यामुळे गांभीर्याने लक्ष देत भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी अशा वाहनचालकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी वाहतूक पोलिसांकडे केली आहे. तसेच कल्याण तहसिदार यांनाही विनंती केली आहे की, या मार्गावरून रेती आणि खडी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनचालकांची चौकशी करावी. या उड्डाणपुलावर अपघात का होतात व अपघात होऊच नये याकरिता लक्ष देण्याकरता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उड्डाणपुलावर ये जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार असल्याने वाहतूक पोलिसांना यामुळे मदत मिळणार आहे. अवजड वाहने सीसीटीव्हीत समोर आल्यावर ताबडतोब कारवाई करा अशी मागणीही म्हात्रे यांनी केली आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi