माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या शैक्षणिक संस्थेत ५ कोटींचा अपहार
जळगाव, 17 जून (हिं.स.)विद्यार्थ्यांनी जमा केलेले शैक्षणिक शुल्क आणि संस्थेच्या नावे आलेले धनादेश (चेक्स) बँकेत जमा न करता, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करून तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात समोर आ
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या शैक्षणिक संस्थेत ५ कोटींचा अपहार


जळगाव, 17 जून (हिं.स.)विद्यार्थ्यांनी जमा केलेले शैक्षणिक शुल्क आणि संस्थेच्या नावे आलेले धनादेश (चेक्स) बँकेत जमा न करता, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करून तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात समोर आला आहे. याप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या ‘श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेच्या लेखापालाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकेश ऊर्फ चेतन गणेश कोल्हे (रा. नशिराबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या लेखापालाचे नाव आहे.संशयित आरोपी लोकेश कोल्हे हा शिरसोली रोडवरील ‘श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेच्या महाविद्यालयात लेखापाल म्हणून कार्यरत होता. १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत त्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुल्कापोटी भरलेली रोकड आणि संस्थेच्या नावाने आलेले विविध धनादेश बँकेत जमा केले नाहीत. हे धनादेश वटवून आणि रोख रक्कम संस्थेच्या खात्यात न भरता, त्याने ती स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरली. हा सर्व गैरप्रकार संस्थेच्या निदर्शनास आल्यानंतर, संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी तातडीने पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाचे गांभीर्य ओळखून आर्थिक गुन्हे शाखेकडून याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान लेखापाल लोकेश कोल्हे यानेच हा कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत अपहार स्पष्ट झाल्यानंतर, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लेखापाल लोकेश कोल्हे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande