
जळगाव, 17 जून (हिं.स.) : महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी 18 मे 2026 रोजी जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना येणाऱ्या अडचणींसाठी संबंधित ठिकाणी पर्यायी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, अमळनेर येथे तहसीलदार कार्यालयाऐवजी उपविभागीय अधिकारी अमळनेर, फैजपूर येथे नगर परिषद सभागृहाऐवजी उपविभागीय अधिकारी फैजपूर, भुसावळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाऐवजी तहसील कार्यालय भुसावळ, जळगाव येथे तहसीलदार कार्यालयाऐवजी उपविभागीय अधिकारी जळगाव, एरंडोल येथे कर्मवीर अभ्यासिका नगर परिषदाऐवजी उपविभागीय अधिकारी एरंडोल, पाचोरा येथे तहसीलदार कार्यालयाऐवजी उपविभागीय अधिकारी पाचोरा तसेच चाळीसगाव येथे तहसीलदार कार्यालयाऐवजी उपविभागीय अधिकारी चाळीसगाव यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
हा बदल केवळ मतदानाच्या दिवशी म्हणजे 18 जून 2026 पुरताच लागू राहणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर