
नाशिक, 17 जून (हिं.स.)। कर्करोग उपचारांच्या क्षेत्रात नाशिकने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मणिपाल समूहाचा एक भाग असलेले सह्याद्री हॉस्पिटल, नाशिक येथे अत्याधुनिक किरणोपचार तंत्रज्ञान सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत 50 हून अधिक कर्करोग रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि नेपाळमधील रुग्णांचाही समावेश आहे.
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच उपलब्ध झालेल्या या प्रगत तंत्रज्ञानामुळे मेंदू, प्रोस्टेट, मणका तसेच शरीरातील अतिसंवेदनशील भागांतील गाठींवर अधिक अचूक आणि सुरक्षित उपचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे नाशिकची ओळख आता केवळ औद्योगिक आणि कृषी शहर म्हणून नव्हे, तर प्रगत कर्करोग उपचार केंद्र म्हणूनही निर्माण होत आहे.या दोन महिन्यांत विभागाने अनेक गुंतागुंतीच्या कर्करोग प्रकरणांवर यशस्वीरित्या उपचार केले. त्यामध्ये नाशिकमधील 50 वर्षीय शिक्षिकेच्या पुनरावृत्ती झालेल्या मेंदूतील पिट्यूटरी अॅडेनोमा गाठीवरील उपचार विशेष लक्षवेधी ठरले. अनेक शस्त्रक्रियेनंतरही वाढत असलेल्या गाठीमुळे दृष्टी गमावण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र अत्याधुनिक किरणोपचार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रियेशिवाय गाठीवर अचूक उपचार करण्यात यश मिळाले.दुसऱ्या एका उल्लेखनीय प्रकरणात अहमदाबादमधील 54 वर्षीय प्रोस्टेट कर्करोग रुग्णाचा उपचार कालावधी पारंपरिक 5 ते 6 आठवड्यांवरून केवळ दीड आठवड्यांपर्यंत कमी करण्यात आला. प्रगत किरणोपचार तंत्रज्ञानामुळे हा उपचार केवळ 5 सत्रांमध्ये पूर्ण झाला. कमी कालावधी, कमी दुष्परिणाम आणि अधिक परिणामकारकता हे या उपचाराचे वैशिष्ट्य ठरले.तसेच नेपाळमधील 29 वर्षीय मणक्यातील गाठीच्या रुग्णाला उपचारांपूर्वी चालणेही कठीण झाले होते. अचूक किरणोपचार, मज्जासंस्था पुनर्वसन आणि सहाय्यक उपचारांच्या मदतीने उपचारानंतर रुग्ण पुन्हा चालू लागला. या यशस्वी उपचाराने रुग्णाला केवळ आरोग्यच नव्हे, तर नवजीवन मिळाले.याबाबत बोलताना श्री. संजय चावला, क्लस्टर संचालक, सह्याद्रि हॉस्पिटल्स – मणिपाल हॉस्पिटल्सचे नेटवर्क हॉस्पिटल, नाशिक म्हणाले, अवघ्या दोन महिन्यांत 50 हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार होणे ही केवळ संख्या नाही, तर उत्तर महाराष्ट्रातील कर्करोग रुग्णांना महानगरांमध्ये न जाता जागतिक दर्जाचे उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याचा विश्वास आहे. आज भारतातील विविध राज्यांबरोबरच शेजारील देशांमधूनही रुग्ण उपचारासाठी नाशिकची निवड करत आहेत.डॉ. रोशनकुमार पाटील, सल्लागार किरणोपचार तज्ज्ञ म्हणाले, या प्रगत तंत्रज्ञानामुळे गाठीवर अत्यंत अचूक उपचार करताना शरीरातील निरोगी अवयवांचे संरक्षण करणे शक्य होते. त्यामुळे उपचारांचे परिणाम अधिक चांगले मिळतात आणि रुग्णांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या बळावर सह्याद्रि हॉस्पिटल्स – मणिपाल हॉस्पिटल्सचे नेटवर्क हॉस्पिटल, नाशिक उत्तर महाराष्ट्रातील कर्करोग उपचारांसाठी एक महत्त्वाचे संदर्भ केंद्र म्हणून उदयास येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV