
लातूर, 17 जून (हिं.स.)।
येथील माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नोव्हेंबर २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन एक वर्ष उलटले तरी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापक अजूनही फरार आहेत. पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, पीडित ठेवीदारांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
या पतसंस्थेत अनेक सेवानिवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी जमा केली होती. मात्र, हक्काचे पैसे वेळेवर परत न मिळाल्याने अनेक कुटुंबे सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, फरार आरोपींना अटक करावी आणि ठेवीदारांना त्यांचा छदाम न् छदाम परत मिळवून देऊन न्याय द्यावा, अशी आर्त हाक पीडितांनी या निवेदनातून दिली आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis