
परभणी, 17 जून, (हिं.स.) दिनांक २१ जून २०२६ रोजी होणारी नीट परीक्षा, १७ ते २६ जूनदरम्यान साजरा होणारा मोहरम, २६ जून रोजी साजरी होणारी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.
आदेशानुसार दि. ३० जून २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दाहक पदार्थ, स्फोटके, दगड अथवा इतर क्षेपणास्त्रे बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यासही बंदी घालण्यात आली आहे.सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, व्यक्ती अथवा मृतदेहांच्या प्रतिमा किंवा आकृत्यांचे प्रदर्शन करणे तसेच सभ्यता, नीतिमत्ता किंवा राज्याच्या सुरक्षिततेस बाधा पोहोचेल अशी आवेशपूर्ण भाषणे, अंगविक्षेप, विडंबन अथवा आक्षेपार्ह चित्रे, फलक व चिन्हांचे प्रदर्शन किंवा प्रसार करण्यासही मनाई करण्यात आली आहे.कलम ३७ (३) अन्वये सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे तसेच मिरवणुका काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, शासकीय कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिलेल्या मिरवणुका व कार्यक्रमांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. मिरवणूक अथवा कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, परभणी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील. असे जिल्हादंडाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis