सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; ७२४ पोलीस अंमलदारांच्या बदल्या
तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ३०० अंमलदारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; १९९ विनंती अर्ज फेटाळले सोलापूर, 17 जून (हिं.स.) : सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या ७२४ पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सध्याच्याच ठिकाणी
SP


तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ३०० अंमलदारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; १९९ विनंती अर्ज फेटाळले

सोलापूर, 17 जून (हिं.स.) : सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या ७२४ पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सध्याच्याच ठिकाणी मुदतवाढ मिळावी किंवा सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी, अशी अनेकांची अपेक्षा असतानाही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कोणताही दबाव न स्वीकारता बदली प्रक्रिया पार पाडली.

या प्रक्रियेत एकाच ठिकाणी अनेक वर्षे कार्यरत असलेल्या आणि ज्यांच्याबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, अशा सुमारे ३०० अंमलदारांवर पोलीस अधीक्षकांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. शिस्तबद्ध व पारदर्शक प्रशासनाचा संदेश देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे.

बदली प्रक्रियेत ४९ अंमलदारांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, १९९ अंमलदारांच्या विनंती बदल्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. संबंधित अंमलदारांपैकी काहींना ‘अघोषित वसूलदार’ म्हणून ओळखले जात असल्याची चर्चा होती. त्यांच्या कामकाजाबाबतच्या तक्रारी थेट पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्याच ठिकाणी राहण्याची मागणी करणाऱ्या काही अंमलदारांविरोधात तक्रारी असल्याने त्यांची जिल्ह्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावरील पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. तसेच काही अंमलदारांना पोलीस मुख्यालयात हलविण्यात आले असून, मुख्यालयात कार्यरत असलेल्या अनेकांना पोलीस ठाण्यांमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

या व्यापक बदली प्रक्रियेमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देण्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिल्याचे मानले जात आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande