सोलापूर - पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करा; आयुक्त ओम्बासे यांचे निर्देश
सोलापूर, 17 जून (हिं.स.)। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, रुंदीकरण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सुरू असलेल्या कामांची महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नीलम नगर परिसरातील १२ नंबर नाल्याला भेट देऊन पाहणी क
evm


सोलापूर, 17 जून (हिं.स.)। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, रुंदीकरण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सुरू असलेल्या कामांची महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नीलम नगर परिसरातील १२ नंबर नाल्याला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी नगरसेविका कलावती गदगे आणि कविता गज्जम यांनी नाल्याच्या विद्यमान आराखड्यातील काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. त्यावर आयुक्तांनी नाल्याचे नैसर्गिक वळण विस्कळीत झाल्यामुळे परिसरात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने नाल्याचे अलाइनमेंट सुधारून पावसाचे पाणी रस्त्यावर न साचता सुरळीत वाहून जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाहणीदरम्यान पुढील भागात एका ठिकाणी नाल्याचा काही भाग बंद करण्यात आल्याचे समोर आले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत नकाशानुसार नाल्याची साफसफाई व रुंदीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.

यानंतर सुमय्या नगर येथील जैतुनबी शाळेजवळील पावसाळी नाल्याचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी नाल्याच्या मार्गावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. शाळा प्रशासनाने नाल्याचा मार्ग बदलण्याची मागणी केली असली, तरी २०११ च्या अधिकृत आराखड्यानुसार आणि केंद्र शासनाने मंजूर केलेल्या योजनेनुसार नाल्याची दिशा बदलणे शक्य नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

नगर अभियंता सारिका आकुलवार यांनीही शाळेकडून नाल्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी शाळा प्रशासनाला अतिक्रमण हटवून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळेसमोरील भागात बंदिस्त नाल्याची रचना करण्याचा पर्यायही सुचविला.

यावेळी नगर अभियंता सारिका आकुलवार, सहाय्यक नगर अभियंता प्रकाश दिवाणजी, कनिष्ठ अभियंता मनोज जाधव तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande