सोलापूर : डॉ. हेडगेवार पटांगणासाठी १ कोटींच्या निधीची घोषणा
सोलापूर, १७ जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होत असून सोलापूरलाही या विकासप्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉ. हेडगेवार पटांगणाच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयांच
sdfg


सोलापूर, १७ जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होत असून सोलापूरलाही या विकासप्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉ. हेडगेवार पटांगणाच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तपपूर्तीनिमित्त पूर्व भागातील श्री यल्लमा मंदिर येथे भाजप शहर मध्य विधानसभेतर्फे सोमवारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे, मोनिका कोठे, महापौर विनायक कोंड्याल तसेच भाजप शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार कोठे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत गोरगरिबांच्या कल्याणासाठी मोठे कार्य केले असून खेड्यापासून दिल्लीपर्यंत विकासाची गंगा प्रवाहित केली आहे. त्यांच्या लोककल्याणकारी निर्णयांमुळे देशाचा विकास वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध देवस्थानांना सभामंडप आणि इतर विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगत, कोणत्याही देवस्थानाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच मागील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या डॉ. हेडगेवार पटांगणाचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पूर्व भागातील मिरवणूक मार्गांवरील विद्युततारा भूमिगत (अंडरग्राउंड) करण्यासाठीही प्रशासनाकडून तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

महापौर विनायक कोंड्याल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विकासदृष्टीचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वामुळे देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात असल्याचे सांगितले. आगामी काळातही त्यांच्याकडून अशीच राष्ट्रसेवा घडत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजप शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या दीर्घकालीन सार्वजनिक सेवेमुळे देशभरातील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आणि विकासाभिमुख राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande