
नाशिक, 17 जून (हिं.स.)। नाशिक महापालिकेच्या नावाने काही अज्ञात व्यक्ती खोटे फॉर्म घेऊन दुकानदारांकडे जात आहेत. तसेच फायर सेफ्टी तपासणी, अग्निशामक दलाची हरकत, परवाना नूतनीकरण आदी कारणे सांगून दुकानदारांकडून फॉर्म भरून घेत आहेत. यावेळी संबंधित व्यक्ती दुकानदारांवर अडीच हजार ते साडेचार हजार रुपये किमतीचे फायर एक्स्टिंग्विशर खरेदी करण्यासाठी दबाव टाकत असून, तसे न केल्यास दुकानाचा परवाना रद्द होईल किंवा महानगरपालिकेकडून कारवाई होईल, अशी भीती दाखवत आहेत. या संदर्भात व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन नगरसेवक प्रवीण जाधव यांनी केले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे खासगी कंपनीकडून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कोणताही फॉर्म भरताना संबंधित व्यक्तीचे अधिकृत ओळखपत्र व महानगरपालिकेचे प्राधिकरण पत्र तपासावे. कोणालाही रोख रक्कम किंवा ऑनलाइन पैसे देण्यापूर्वी खात्री करावी. दबाव टाकला जात असल्यास त्वरित नाशिक महानगरपालिका, अग्निशमन विभाग किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा व्यक्तींचे नाव, मोबाईल क्रमांक, फोटो किंवा व्हिडिओ उपलब्ध असल्यास ते जतन करून ठेवावेत, असे आवाहनही नगरसेवक प्रवीण जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV