
लातूर, 17 जून, (हिं.स.)। पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सशक्त व्हावा, नागरिकांच्या समस्या त्यांच्या परिसरातच ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण व्हावे तसेच प्रत्येक नागरिकाला आपल्या पोलीस स्टेशनमधील प्रभारी अधिकारी आणि बीट अंमलदारांची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलीस दलाने पोलीस आपल्या सोसायटीमध्ये हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरी भागातील नागरिकांना किरकोळ समस्या, वाहतूक, सुरक्षितता, महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी, शेजारी वाद, पार्किंग समस्या तसेच इतर कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील प्रश्नांसाठी पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी पोलीस अधिकारी थेट नागरिकांच्या सोसायटीमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. या माध्यमातून नागरिक आणि पोलीस यांच्यातील दरी कमी होऊन विश्वासाचे नाते अधिक दृढ होत आहे.
दि. १५ जून २०२६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमात लातूर शहर, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा, चाकूर तसेच जिल्ह्यातील इतर शहरी भागांमध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, बीट अधिकारी व बीट अंमलदार यांनी नियोजित वेळापत्रकानुसार विविध सोसायट्यांना भेटी दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून आपल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा पोलीस प्रशासनासमोर मांडल्या.
उपस्थित नागरिकांनी आपल्या परिसरातील वाहतूक, सुरक्षाविषयक उपाययोजना, संशयित हालचाली, सीसीटीव्ही व्यवस्था, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक ठिकाणांवरील समस्या आदी विषयांवर चर्चा केली. अनेक ठिकाणी प्राप्त झालेल्या तक्रारी व सूचनांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून काही समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले.
या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नागरिकाला त्यांच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, बीट अधिकारी व बीट अंमलदार यांची माहिती तसेच संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अथवा अडचणीच्या वेळी नागरिकांना थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे अधिक सुलभ होणार आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम नागरिकाभिमुख पोलीसिंगचा एक आदर्श नमुना ठरत असून पोलीस हे जनतेचे मित्र आहेत हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित होत आहे. नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी जाऊन ऐकून घेणारी आणि तत्परतेने त्यावर उपाययोजना करणारी पोलीस यंत्रणा ही लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी ओळख बनत आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाने सर्व नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले असून आपल्या परिसरातील समस्या, सूचना व अपेक्षा मांडून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे हा उपक्रम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करण्यासाठी तो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis